हॅशटॅग माफीवीरने पुन्हा खळबळ, आता मराठा नेत्यांना केले टार्गेट

Foto

औरंगाबाद – शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावर शुक्रवारी ‘#माफीवीर सावरकर लिहून अज्ञाताने खळबळ उडवून दिली होती. त्याच्या दुसऱ्याच रात्री पुन्हा एकदा हॅशटॅग माफीवीरचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. ‘#माफीवीर सावरकरनंतर आता मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांना टार्गेट करण्यात आले आहे.


‘#माफीवीर सावरकरनंतर आता ‘#माफीवीर  खेडेकर 

वसंतराव नाईक चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावर शुक्रवारी रात्री हॅशटॅग माफीवीर सावरकर लिहिले गेले होते. या कृत्याचा शोध लागण्याआधीच सलग दुसऱ्या दिवशी हॅशटॅग माफीवीर खेडकर असे लिहिलेले फोटो शनिवारी मध्य रात्रीपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. स्वा. सावरकर उड्डाणपुलावरील अक्षरे पोलिसांनी शुक्रवारीच काळ्या रंगाने मिटवून टाकली. मात्र शनिवारी व्हायरल झालेले फोटो कोणत्या रस्त्यावरील आहेत याचा अद्याप तपास लागलेला नाही. हे फोटो औरंगाबाद शहरातील  आहेत की बाहेरचे, याचा पोलिस शोध घेत आहेत.

 

सावरकर आणि खेडेकर यांच्या नावाने रस्त्यावर विकृत लिखान करणारे कोण आहेत, आणि हे फोटो सोशल मीडियावर नेमके कोणाकडून व्हायरल होत आहेत, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचा सायबर सेल करत आहे. या कृत्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून नागरिकांनी त्याकडे लक्ष देऊ नये आणि शांतता बाळगावी असे आवाहन औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी केले आहे.